पनवेल ः वार्ताहर
खांदा वसाहतीतील सेक्टर 6 व 9 येथील उद्यानात मोठ्या प्रमाणात रहिवासी येत असल्याने या ठिकाणी सायंकाळी प्रचंड गर्दी होते. त्या अनुषंगाने येथे शौचालयाची व्यवस्था असावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी पनवेल मनपाकडे केली होती. या मागणीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन जागेची पाहणी करण्यात आली. लवकरच दोन्ही ठिकाणी ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. नवीन पनवेलच्या पश्चिम भागात असलेला खांदा कॉलनीचा परिसर गजबजलेला आहे. येथील लोकवस्तीही दिवसेंदिवस वाढत आहे. सेक्टर 6 आणि 9 येथे सिडकोची उद्याने आहेत. सकाळ-संध्याकाळी नागरिक वॉकसाठी या ठिकाणी येतात. ज्येष्ठ नागरिक येथे शतपावली करतात. त्यामुळे उद्यानात कायम गर्दी असते. सुटीच्या दिवशी ही उद्याने गजबजून जातात. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीतसुद्धा गार्डन हाऊसफुल असतात रहिवाशांना विरंगुळा आणि क्षणभर विसाव्यासाठी ही दोनच उद्याने आहेत. त्यामुळे येथे पायाभूत सुविधा असाव्यात, अशी मागणी स्थानिक नगरसेवक सातत्याने करीत होते. येथे नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नाही. परिणामी नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर उद्यानांत शौचालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक एकनाथ गायकवाड, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, ज्येष्ठ नगरसेविका सीताताई पाटील आणि कुसुम पाटील यांनी केली होती. येथे ई-टॉयलेट असावेत, असा आग्रह महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे त्यांनी धरला होता. एकनाथ गायकवाड यांनी याबाबत महापालिकेला पत्रव्यवहार केला होता. नगरसेविका सीताताई पाटील यांनीसुद्धा यासाठी सिडकोकडे 2014पासून पाठपुरावा केला. त्यानंतर मनपा प्रशासनाकडेही याबाबतची मागणी केली होती. स्वच्छ भारत अभियान त्याचबरोबर स्वच्छता सर्वेक्षण याशिवाय नागरिकांची होणारी गैरसोय या गोष्टी लक्षात घेऊन नगरसेवकांच्या मागणीला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार खांदा वसाहतीतील उद्यानांमध्ये ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. यासाठी जागेची पाहणीसुद्धा प्रशासनाकडून करण्यात आली. या वेळी संबंधित नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी अधिकार्यांना काही सूचना केल्या. कनिष्ठ अभियंता अनिल कोकरे, चिन्मय सापने, सुमेध गायकवाड, आदेश गायकवाड व मनोज टाक यांनी प्राथमिक पातळीवर सर्वेक्षण केले.
दोन्ही उद्यानांत जॉगिंगसाठी रहिवासी मोठ्या संख्येने येतात. येथे चिल्ड्रन पार्क असल्याने लहान मुले खेळण्यासाठी येतात. ज्येष्ठ नागरिकही उद्यानात सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारतात. येथे सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची गैरसोय होते. आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांनीही येथे शौचालय असावे अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून याबाबत हालचाली सुरू झाल्यात.
-एकनाथ गायकवाड,
नगरसेवक, पनवेल महापालिका
येथे सार्वजनिक स्वच्छतागृह असावे, अशी मागणी गेल्या सहा वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करीत आहोत. महापालिकेने स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून व नागरिकांची गैरसोय टळून आरोग्य आबाधित राहावे यासाठी ई-टॉयलेट उभारण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद!
-सीता पाटील, नगरसेविका