Breaking News

शून्य मृत्यूदराचा पालिकेचा संकल्प; सक्षम आरोग्यसेवेसाठी सज्जता; उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक

नवी मुंबई ः प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका सातत्याने कार्यरत आहे. आता कोरोनाकाळात शून्य मृत्यूदर आणण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात असून दररोज संध्याकाळी शहरात झालेल्या कोविड मृतांचा अहवाल सादर करून त्यावर चर्चा केली जाते. या चर्चेत रिलायन्स, तेरणा यांसारख्या खासगी रुग्णालयांतील निष्णात डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. त्यांच्याशी प्रत्येक कोविड मृत्यूबद्दल चर्चा केली जात असून मृत कोविड रुग्णाला देण्यात आलेल्या उपचारांबद्दल माहिती घेतली जात आहे. ही पद्धत मोठ्या खासगी रुग्णालयातील रुग्णाबाबत कशा प्रकारे अवलंबिली जाते ते पाहिले जाणार आहे. पालिका करीत असलेल्या उपाययोजना खासगी रुग्णालयांतील कर्मचारी व डॉक्टरांनी पाहावी यासाठीही कर्मचार्‍यांची अदलाबदल केली जाणार आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयात जास्तीत जास्त अत्यवस्थ रुग्णांसाठी रुग्णशय्या राखीव ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाची ढासळलेली प्रकृती सुधारावी यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्रिसूत्री कार्यक्रम ठरविला आहे. त्यातील एक भाग म्हणून कोविड रुग्णालयात काम करणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांना काही खासगी रुग्णालयांत प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, तर खासगी रुग्णालयांतील कर्मचार्‍यांनाही पालिकेचे कामकाज जवळून पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या विभागाचा स्वतंत्र कारभार पाहत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उपायुक्त दर्जाचा अधिकारी लवकरच नियुक्त केला जाणार आहे.कोविडचा सामना करण्यासाठी उभारण्यात आलेली आरोग्य यंत्रणा मागील दोन महिन्यांत सावरू लागली आहे. या विभागात जबाबदारी झटकण्याच्या वृत्तीवर पालिका आयुक्त बांगर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत सडेतोड भूमिका घेतली. आरोग्य विभागातील अनागोंदी संपविण्यासाठी लवकरच अनेक डॉक्टर व डॉक्टरेतर कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नवीन अधिकार्‍याच्या हाती सूत्रे दिली जाणार असून या विभागाचा स्वतंत्र कारभार व देखरेखीसाठी नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. कोविड रुग्णालयात काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांना अपोलो, फोर्टिज या खासगी रुग्णालयांत प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. 

महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोविडच्या भयावह संकटकाळात अत्यंत सक्षमपणे आपले कार्य करीत आहे. त्यात काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याने आरोग्य यंत्रणेत काही फेरफार आणि बदल केले जाणार आहेत. उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी स्वतंत्रपणे या यंत्रणेचा कारभार पाहील अशी तजवीज केली जाणार आहे. खासगी रुग्णालयातील कर्मचारी पालिकेत आणि पालिकेचे कर्मचारी खासगी रुग्णालयांत सेवा देऊन आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत.

-अभिजित बांगर, पालिका आयुक्त

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply