पनवेल ः वार्ताहर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाला हरविण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत 5 ऑक्टोबरपर्यंत अवघ्या 20 दिवसांत तब्बल एक लाख 77 हजार 935 कुटुंबांतील एकूण सहा लाख 65 हजार 919 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 393 नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यातील 277 जणांची तपासणी केली असता 106 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले, तर पनवेल तालुक्यातील घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 98.07 पेक्षा जास्त कोमोरवीड असलेल्या नागरिकांमध्ये नऊ जण, एसओपी 2.95 पेक्षा कमी असलेल्या नागरिकांमध्ये 92 जण, कोमोरवीड (दुर्धर आजार) असलेल्या व्यक्तींमध्ये 1479 जण, तर आयएलआर-सारी या आजाराची लक्षणे असलेल्या 113 नागरिकांचे अहवाल सादर करण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील संशयित आढळलेल्या 88 रुग्णांना जवळील प्राथमिक केंद्रामध्ये पाठविण्यात आले. पनवेल तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आतापर्यंत आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात 16,122 कुटुंबांतील 53,547 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात 8319 कुटुंबांतील 31,149 नागरिक, आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील 10,838 कुटुंबांतील 40,486 नागरिक, वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3967 कुटुंबांतील 13,062 आणि नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 14,536 कुटुंबांतील 56,819 नागरिकांची तपासणी करण्यात आली.