ममतांसमोर गळती रोखण्याचे आव्हान
कोलकाता ः वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी पक्ष सोडल्याने मुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे.
ममता यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मोठा धक्का मानला जात असतानाच जितेंद्र तिवारी यांनीही तृणमूलला रामराम केला. दोन नेत्यांच्या राजीनाम्याने पश्चिम बंगाल राजकारणात खळबळ उडालेली असतानाच तृणमूलच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. आमदार शीलभद्र दत्त यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूल काँग्रेसचे नेते कबिरूल इस्लाम यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूलचा राजीनामा देणारे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत.