पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत पनवेल तालुक्यात 182 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 70 टक्के सवेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 22 सप्टेंबर रोजी या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 600 कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत. या उपक्रमात नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेणे, त्यांच्या आजारपणाची माहिती, ताप तपासणी, शरीरातील ऑक्सिजन तपासणी, कोरोनासाठी अँटिजेन टेस्ट आदी प्रक्रिया पूर्ण केली जाते. दोन कर्मचारी 233 टीमच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करीत आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका, अशा वर्कर आदींसह बहुउद्देशीय कर्मचार्यांचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आठ लाख 40 हजार 321 नागरिक आहेत. यामध्ये एक लाख 57 हजारे 411 कुटुंबे आहेत. यापैकी पाच लाख 95 हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत सुमारे 182 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलग करून उपचार दिले जात आहेत. काही ठिकाणी सर्वेक्षण उत्तमरीत्या सुरू आहे. काही ठिकाणी सर्वेक्षणासाठी निवडलेले कर्मचारी चालढकल करीत असल्याचा आरोप तक्का येथील भाजपचे कार्यकर्ते गणेश वाघीलकर यांनी केला आहे. घरातील सदस्यांची तपासणी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत पालिका क्षेत्रात 70 टक्केपेक्षा सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पालिका क्षेत्रात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचण्याचा उद्देश आहे. आजपर्यंतच्या सर्वेक्षणात 182 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी समस्यांसंदर्भात तक्रार केल्यास आम्ही निश्चितच समस्यांचे निवारण करू.
– सुधाकर देशमुख, आयुक्त