खोपोली : प्रतिनिधी
कोरोना कालावधीत समाजोपयोगी उपक्रम राबविणार्या कोविड योद्ध्यांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. खोपोलीतील लोहाणा समाज सभागृहात सोमवारी (दि. 12) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना दानरत्न पुरस्कार, योगी भाईनाथ महाराज यांना कोरोना योद्धा, तर खोपोलीतील नगरसेवक किशोर पानसरे यांना सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विश्व हिंदू परिषदेच्या या उपक्रमाचे स्वागत केले. अशा उपक्रमांमुळे समाजात काम करणार्यांना स्फूर्ती मिळते व त्यांच्यापासून इतर जणही प्रेरणा घेऊन काम करीत आहेत. आपण दिलेल्या पुरस्काराचा मनापासून स्वीकार करून यापुढेही अधिक जोमाने समाजात काम करीत राहीन, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. भाजपचे दिवंगत तालुकाध्यक्ष बापू घारे यांचे या कार्यक्रमात आमदार ठाकूर यांनी स्मरण केले. योगी भाईनाथ महाराज व नगरसेवक किशोर पानसरे यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानपत्र बहाल करण्यात आले, तर विहिंपचे कुलाबा जिल्हा मंत्री रमेश मोगरे यांच्या हस्ते आमदार ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे तालुका कार्यवाह अविनाश मोरे, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, ज्येष्ठ नगरसेवक तुकारामशेठ साबळे, शहर सरचिटणीस ईश्वर शिंपी, ज्येष्ठ नेते अॅड. राजेंद्र येरुणकर, ज्येष्ठ कार्यकर्ते आबा देशमुख, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, कार्यकर्ते सिद्धेश पाटील, महिला मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष रसिका शेटे, भाजपचे ज्येष्ठ नेते केशवबुवा बुरुणकर, चौकचे पंकज शहा, कर्जतचे किशोर बुंडीरे यांच्यासह कर्जत, खालापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत झाल्यानंतर प्रास्ताविक रमेश मोगरे यांनी केले. त्यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याची तपशीलवार माहिती दिली, तर या सोहळ्याचे सूत्रसंचालन बजरंग दलाचे कुलाबा संयोजक साईनाथ श्रीखंडे यांनी केले.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात देशासह राज्यभरात व जिल्ह्यात झपाट्याने सुरू झाला होता. या परिस्थितीत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य माणूसही मोठ्या जिद्दीने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काम करीत होते. त्यामुळे आज झालेला हा सन्मान आमचा वैयक्तिक नसून या कार्यात सक्रिय असणार्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, असे मी मानतो.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, उत्तर रायगड भाजप