Breaking News

लोण्याचा गोळा मटकावणार्‍या बोक्याच्या भूमिकेत प्रितम म्हात्रे

शेकाप नेत्यांचा वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न सुरूच

पनवेल ः रामप्रहर वृत्त
‘कर्नाळा बँक घोटाळा आणि नागरिकांना परत करण्यात येणारे पैसे’ या मुद्द्यांवर शेकापचे युवा नेते आणि पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी अलिकडेच केलेले निवेदन वाचता त्यांना रायगडात काय चालले आहे याची कल्पनाच नाही, असा समज कोणाचाही होऊ शकतो, पण ‘आयजीच्या जिवावर उदार’ झालेल्या आमदाराचे पत्र आणि प्रितम म्हात्रे यांचा मेसेज वाचताच ‘दोघांच्या भांडणात मध्यस्थी करताना लोण्याच्या गोळ्यावर ताव मारणार्‍या बोक्याची आठवण या दोघांना पाहून पनवेलकरांना होत आहे. त्यामुळे या दोघांचे पत्र आणि मेसेज वाचून शेकाप नेत्यांचे खरे रूप उघड झाले असून पनवेलकरांच्या संतापाचा कडेलोटही होतोय.
प्रितम म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना (खरे तर सर्वांसाठी) एक भावनिक मेसेज पाठवलाय. तो वाचल्यानंतर एका सामान्य पनवेलकराने ‘राम प्रहर’ला फोन करून काही मुद्दे उपस्थित केले. ते ‘राम प्रहर’च्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
प्रितम म्हात्रे आपल्या मेसेजमध्ये विवेक पाटील यांचा उल्लेख ‘आमदार’ असा करतात. विवेक पाटील हे माजी आमदार आहेत याची कल्पना प्रितम म्हात्रे यांना नाही का?
प्रितम म्हात्रे मेसेजमध्ये पुढे म्हणतात, ‘कर्नाळा बँकेत जो गैरव्यवहार झाला होता त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांनी (म्हणजे विवेक पाटील यांनी) आपली सर्व मालमत्ता जमा केली.’ हे वाचून आम्हाला प्रश्न पडतो की, कर्नाळा बँकेचे नेतृत्व विवेक पाटील यांच्याकडे असताना बँकेत जो गैरव्यवहार होतो त्याची माहिती विवेक पाटील यांना नव्हती, असा प्रितम म्हात्रे यांचा भाबडा समज झाला आहे का?
तसेच जो गैरव्यवहार झाला त्याची जबाबदारी विवेक पाटील यांनी घेतल्याचे आणि आपली सर्व मालमत्ता जमा केल्याचे त्यांनी (म्हणजे विवेक पाटील यांनी) स्वत: कधीही जाहीर केले नाही. याउलट सहकार खात्याने केलेल्या तपासात पाटील यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांनीच या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याची माहिती प्रितम म्हात्रे यांना नाही का?
‘आपली सर्व मालमत्ता विवेक पाटील यांनी जमा केली नसून ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डिरेक्टरेट या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणेने विवेक पाटील यांना अटक करून या प्रकरणी तपास केला. तपास सुरू असतानाच विवेक पाटील यांची मालमत्ताही ‘ईडी’ने जप्त केली आहे. याचीही कल्पना प्रितम म्हात्रे यांना नाही का? प्रितम म्हात्रे आपल्या मेसेजमध्ये पुढे लिहितात, ‘बँकेने काढलेल्या इन्शुरन्समुळे कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे जे ठेवीदार आहेत ज्यांना आपण पाच लाखापर्यंतची रक्कम परत मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष म्हणून प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांतच कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखापर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनच्या नियमानुसार खातेदारांना परत मिळणार आहेत, परंतु या गोष्टीचा राजकीय फायदा घेण्यासाठी भाजपवाले पुढे सरसावले आहेत’, या प्रितम म्हात्रे यांच्या विधानांमध्ये राजकारण स्पष्ट दिसत आहे.
कारण कुठल्याही ठेवींवर विमा काढणे बँकेला बंधनकारक आहे तसेच ते कर्नाळा बँकेलाही बंधनकारक होतेच. त्यामुळे असा विमा काढून कर्नाळा बँकेने ग्राहकांवर काही उपकार केलेले नाहीत, याची प्रितम म्हात्रे यांना जाणीव आहे का?
ग्राहक यापूर्वी एक लाखाच्या ठेवींवर विम्याचे संरक्षण घेऊ शकत होते. ही एक लाखांची मर्यादा वाढवून आता पाच लाख रूपयांपर्यंतच्या ठेवींसाठीही ग्राहक विमा संरक्षण घेऊ शकतात. विम्यासाठीची ही मर्यादा केंद्र सरकारनेच रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनच्या नियमानुसार अलिकडेच वाढवली आहे. त्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रयत्न केल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे प्रितम म्हात्रे साहेब, जी रक्कम नियमानुसार आपसूकच मिळणार आहे ती देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कसा काय आणि कशासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आपण का निर्माण करीत आहात याचा खुलासा होईल का?
प्रितम म्हात्रे साहेब, आपल्या मेसेजमध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना, खातेदारांशी शांतपणे बोलण्याचा जो सल्ला देत आहात तो मुळात शेकापच्या जवळपास सर्वच नेत्यांना लागू होतो, असे आपल्याला वाटत नाही का?
पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे हे वेड पांघरून पेडगावला जाण्याचे उद्योग करीत असले तरी पनवेलकर मात्र आता शहाणे झाले आहेत. त्यांना कर्नाळा बँक घोटाळ्यामागचे इंगित हळूहळू उलगडू लागले आहे. ‘तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो’ ही ‘कु’निती आता सर्वांच्या ध्यानात येऊ लागली आहे. खोटा आव आणण्याचे उद्योग आता तरी शेकापने बंद करावेत, असे पनवेलकरांना वाटते.
प्रितम जनार्दन म्हात्रे ‘याचा’ तरी खुलासा करा
सहकार खात्याच्या तपासात असे आढळून आले आहे की, कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील जे बोगस कर्जदार आहेत त्यांच्या कर्ज प्रकरणासोबत जे. एम. म्हात्रे आणि कंपनीच्या संदर्भातील वर्क ऑर्डर्स जोडल्याचे चौकशीत आढळले आहे. त्याबाबत प्रितम जनार्दन म्हात्रे काही खुलासा अथवा बाजू मांडतील का?

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply