पनवेल ः वार्ताहर
गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, येत्या शनिवारी (दि. 17) देवीची घटस्थापना होणार असल्याने देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे देवीला लागणार्या पूजा साहित्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. नवरात्रोत्सवामध्ये सार्वजनिक आणि घरगुती देवींची प्रतिष्ठापना करण्यात येते. या उत्सवांत देवीची नऊ दिवस पूजा केली जाते. त्यासाठी लागणारे साहित्य खण, वेणी, कापूर, धूप, अगरबत्ती, फुले, दागिने व इतर वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. कोरोनामुळे उद्भवलेली संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण नियम पाळून साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे. याबाबत मार्गदर्शक सूचनाही जाहीर करण्यात आलेल्या आहेत. नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी हा उत्सव श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करण्यासाठी भाविकांची पावले विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळू लागली असल्याचे दिसून येत आहे.