Breaking News

तंदुरुस्ती पथकाच्या मदतीने पोलीस दल कोरोनामुक्तीकडे

मृत्यूचे प्रमाण शून्यावर

पनवेल : बातमीदार

दिवसरात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍या पोलीस बांधवांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाकाळात उपचार घेत असताना कोणतीही उणीव भासू नये, यासाठी ऑगस्टच्या मध्यावधीस तंदुरुस्ती पथक (वेलनेस टीम) नेमण्यात आले होते. या पथकामुळे नवी मुंबई क्षेत्रातील पोलिसांची कोरोनामुक्तीची वाट सोपी झाली. सप्टेंबरमध्ये 500हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपचाराधीन होते. ही संख्या आता 26 वर आली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले आहे.

तंदुरुस्ती पथकाने गेल्या दोन महिन्यांत उपचाराधीन पोलीस कर्मचार्‍यांना रुग्ण शोध ते कोरोना उपचार केंद्रातील उपचारांपर्यंतची मदत पुरवली. संशयितांना तत्काळ शोधून त्यांची चाचणी करणे, चाचणीत संशयितांना ताप, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे आढळल्यानंतर त्यांना करोना काळजी केंद्रात दाखल करणे, त्याच वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तशीच लक्षणे दिसत आहेत का, याची एकाच वेळी पाहणी करण्याची आणि त्याची माहिती पोलीस आयुक्तांना देण्याची महत्त्वाची जबाबदारी या पथकावर होती. आजही ते ही जबाबदारी पार पाडत आहेत. वैद्यकीय अधिकार्‍यांशी योग्य समन्वय राखत ही किमया साधल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई पोलिसांनी दिली.

देशात 23 मार्चपासून लागू झालेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक ताण पोलिसांवर होता. घरी राहण्याच्या नियमाची अंमलबजावणी पोलिसांना रस्त्यावर उतरून करावी लागली. सुरुवातीला बाधितांची संख्या मर्यादित असली तरी संसर्ग पसरू नये, यासाठी नागरिकांना ‘स्व-अलगीकरणात’ ठेवण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांनीच पार पाडली. मात्र, पावसाळ्यानंतर पोलिसांमध्ये संसर्ग पसरल्याचे कटू वास्तव अधिकार्‍यांना पचवावे लागले आणि तत्कालीन आयुक्त संजयकुमार यांनी तंदुरुस्ती पथकाची स्थापना केली. पथकात दोन उपायुक्त एक सहाय्यक पोलीस आयुक्त आणि दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. विद्यमान पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी तंदुरुस्ती पथकाला पूर्ण मोकळीक दिली आहे.

पोलिसांसाठी खास आरक्षित असलेल्या सावली आणि निवारा अलगीकरण केंद्रात सध्या दहा टक्क्यांपर्यंत खाटा भरलेल्या आहेत. सुरुवातीला या केंद्रात खाटा उपलब्ध होत नव्हत्या.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply