पैठण : प्रतिनिधी
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का, असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असेही त्यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितले घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झाले नाही. ह्यांना एकट्यालाच कोरोना खातो की काय? राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले. मागच्या वर्षीही ते बांधावर गेले. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे. आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा. आता लोक मोबाइल उघडून पाहातात आणि खिशात ठेवतात, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
आमच्या सरकारने शेतकरी, गोरगरीबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारने काय दिले, असा सवाल दानवे यांनी केला. हे सरकार कोण चालवतंय, कोण निर्णय घेतंय काय कळतच नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेले हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याचे काय होईल काही सांगता येत नाही, असेही दानवे म्हणाले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …