नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई पालिकेने कोविडवर लक्ष केंद्रित करतानाच स्वच्छ सर्वेक्षणाची तयारीही सुरू केली आहे. 2019-20 सालात देशात तिसरा, तर राज्यात पहिला क्रमांक आल्याने पालिकेचा हुरूप वाढला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरासह पालिकेकडून वनखात्याच्या हद्दीतील किनारी भागांतील स्वच्छताही केली जात आहे. एनवायर्नमेंट लाइफ संस्थेच्या माध्यमातून पालिकेने करावे गाव टी. एस. चाणक्यच्या मागे असलेल्या खाडीकिनारी भागात रविवारी (दि. 18) स्वच्छता मोहीम राबविली. या वेळी विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला. या मोहिमेत तब्बल 700 किलो कचरा गोळा करून रीतसर पुढील प्रक्रियेसाठी तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंडवर जमा करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेने यंदा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत देशात इतर शहरांच्या तुलनेत उत्तुंग झेप घेतली आहे. कोविडचे संकट डोक्यावर घोंगावत असताना व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना पालिकेने स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली आहे. नागपूर महापालिकेत असताना आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छ भारत अभियानात विशेष कामगिरी केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेबाबत आयुक्तांचे विशेष लक्ष असणार हे गृहीत धरून अधिकारीवर्ग कामाला लागला आहे. शहरांतर्गत स्वच्छता करतानाच पालिकेने शहराला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीकिनार्याकडेही लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार एनवायर्नमेंट लाइफ संस्थेसोबत पालिका खाडीकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आहे. ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या आजमितीस सात फेर्या झाल्या आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांनदेखील स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. त्यानुसार सीवूड्स करावे गाव टी. एस. चाणक्यशेजारी असलेल्या खाडीकिनारी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. खाडीकिनारी श्रमदान करून तब्बल 700 किलो कचरा गोळा करण्यात आला. यात प्लास्टिक कागद, प्लास्टिक बॉटल्स, दप्तर, ओळखपत्रे, चपला, बूट, प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, काचेच्या बाटल्या असा कचरा आढळून आला. मुख्य म्हणजे पनवेल, मुंबई, ठाणे व उरण येथील खाडीतून कचरा नवी मुंबई किनार्यावर येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे व बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष धर्मेश बराई व सदस्य, वनविभागाच्या अधिकारी स्नेहा सातव, घनकचरा विभागाचे विजय नाईक तसेच कर्मचारी व शाळेचे विद्यार्थी या वेळी सहभागी झाले होते.