पनवेल : वार्ताहर
खांदा कॉलनीतील विविध कामांना तत्काळ अंतरिम मंजुरी देऊन ती पूर्ण करण्यात यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडको प्रशासनातील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. कामांना लवकरात लवकर सुरुवात करून स्थानिक नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्याची मागणी भोपी यांनी केली आहे. सिडकोला दिलेल्या निवेदनात भोपी यांनी म्हटले आहे की, खांदा कॉलनीमधील सुप्रसिद्ध व नेहमीच वर्दळ असणारे खांदेश्वर मंदिर, तलाव व उद्यान परिसरात तलावाचा गाळ काढणे, सुशोभीकरण व विसर्जन घाट करणे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसविणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यानात ओपन जिम व जॉगिंग ट्रॅक, परिसरातील नादुरुस्त पथदिवे चालू करून नवीन पुरेसे पथदिवे लावणे आदी मूलभूत तसेच इतर सोयीसुविधांची पूर्तता करण्यात यावी याकरिता मागील दोन वर्षांपासून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको प्रशासनबरोबर अनेकदा पत्रव्यवहार करून स्वतः आमदार प्रशांत ठाकूर व मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यातील बर्याचशा कामांच्या फाइल्स नवीन पनवेल कार्यालयातून सीबीडी-बेलापूर कार्यालयातील अकाऊंट विभागाकडे पाठविण्यात आल्या. त्या मंजूर करण्यात आल्या असून, सध्या मुख्य अभियंता विभागात आहेत. मुख्य अभियंता यांच्याकडून स्वाक्षरी होताच फाइल्स अंतरिम मंजुरीसाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे जाणार असून, त्यांची मंजुरी मिळताच टेंडर काढले जाऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर करावी.