भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरेंची मागणी
नागोठणे : प्रतिनिधी
परतीच्या पावसाने नागोठणे विभागातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाचे आदेश असतानाही अद्यापही या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नाही. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरेंची यांनी केली आहे.
महसूल विभागाच्या नागोठणे, वरवठणे, पाटणसई, ऐनघर, वेलशेत तलाठी सजांमधील अनेक गावांतील शेतकर्यांच्या शेतीचे मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. भातकापणीचा हंगाम सुरू होतानाच अचानक परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने नागोठणे विभागातील शेकडो एकर भातशेती धोक्यात आली आहे. तयार झालेले भात आणि पेंढा कवडीमोल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. मात्र कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अद्याप आलेला नाही. त्याकडे आमदार रविशेठ पाटील तसेच जिल्हाधिकारी आणि राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधणार असल्याचे मारुती देवरे यांनी सांगितले.
3 जूनच्या वादळात नागोठणे विभागात अनेक घरे पडली होती तसेच शेतीचेसुद्धा नुकसान झाले होते. तेव्हा पंचनामे झाले असले तरी, नियोजनाअभावी शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अनेकांना अजून नुकसानभरपाई मिळालीच नसल्याचे मारुती देवरे सांगितले.
परतीच्या पावसामुळे नागोठणे विभागातील नागरी सुविधांचेसुद्धा तीन तेरा झाले असून, त्या नियमित होण्याच्या दृष्टीने आमदार रविशेठ पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सहकार्य मिळण्यासाठी त्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधणार असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले.
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याबाबत अद्याप कोणत्याही सरकारी पथकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने पंचनामे चालू करण्यात आले नाहीत.
-गणेश विटेकर, तलाठी, नागोठणे