अलिबाग : प्रतिनिधी
देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना बुधवारी (दि. 21) जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस कवायत मैदान येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलनही झाले.
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, रोहा पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, अलिबाग पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, संचलन प्रमुख राखीव पोलीस निरीक्षक भास्कर शेंडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विविध पोलीस दलांमधील 26 अधिकारी आणि 240 अंमलदारांना आपले कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली.