कर्जत : बातमीदार
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीने कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ गावाच्या नाक्यावर पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र बंद असलेले पोलीस चौकीच्या जागेवर आता वडापावचे दुकान थाटण्यात आले आहे. दरम्यान, डिकसळ नाक्यावर पोलीस चौकीचे काम सुरू असल्याचे पत्र 2018 मध्ये नेरळ पोलीस ठाण्याला देणारी उमरोली ग्रामपंचायत ऑक्टोबर 2020 मध्ये डिकसळ गावात कुठेही पोलीस चौकी नसल्याचा ठराव घेते, हे कसं काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ किशोर गायकवाड यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने उमरोली ग्रामपंचायतीने 2016 मध्ये डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी उभारण्याचे काम सुरू केले होते, मात्र ते 2018 पासून बंद आहे. या अर्धवट बांधकाम केलेल्या जागेत आता वडापावचे दुकान सुरू करण्यात आले आहे.
उमरोली ग्रामपंचायतीने 4 जानेवारी 2018 रोजी नेरळ पोलीस ठाण्याला दिलेल्या पत्रात डिकसळ नाक्यावर पोलीस चौकीचे काम सुरू आहे, असे कळविले होते. पण तीच उमरोली ग्रामपंचायत 13ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र काढून डिकसळ गावात कुठेही पोलीस चौकी नाही आणि पोलीस चौकीचे कामदेखील सुरू नाही, असा ठराव घेऊन कळवित आहे. या ठरावावर डिकसळ गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.