मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक बाळकृष्ण विष्णु ऊर्फ प्रमोद कोनकर यांच्यासह विविध विभागातील दहा पत्रकारांना दर्पण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्या 28व्या सन 2020च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य सेवेसाठी झोकून देऊन काम करणारे पत्रकार मंगेश चिवटे, मराठवाडा विभागातून आनंद कल्याणकर (आकाशवाणी प्रतिनिधी नांदेड), विदर्भ विभागातून डॉ. रमेश गोटखडे, अमरावती (स्तंभलेखक, दै. हिंदुस्थान अमरावती), पश्चिम महाराष्ट्रातून ज्येष्ठ समाजवादी लेखक व संपादक विनोद शिरसाट (पुणे), उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून पत्रकार मिलींद चवंडके (अहमदनगर), मुंबई विभागातून सा. पोलादपूर अस्मिताचे संपादक रविंद्र मालुसरे, महिला विभागातून दै. लोकमतच्या पुणे येथील विशेष प्रतिनिधी नम्रता फडणीस यांचा समावेश आहे, तर विशेष दर्पण पुरस्काराचे दै.लोकमतचे प्रतिनिधी शिवाजी पाटील (कोल्हापूर), सा. कमला भवानी संदेशचे संपादक अॅड. बाबुराव हिरडे (सोलापूर), दै. तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी प्रा. रमेश आढाव (सातारा) हे मानकरी ठरले आहेत.