पेण : वार्ताहर
पेण न. प. प्रकरणात पोलिसांनी रात्री 2.30 वाजता आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती केल्याने आमदार रविशेठ पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग ठराव मांडणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले कि, अनिरुध्द पाटील यांच्यावर चोरीचा, खुनाचा, दरोड्याचा गुन्हा असल्यासारखे पोलिसांनी घरातील मंडळींना वागणूक दिली असून रात्री 2.30 वाजता घरातील महिला, लहान मुले यांना उठवून आमदाराच्या निवास स्थानाची झडती घेणे कितपत योग्य आहे. यावरुन पोलीस यंत्रणा तटकरेच्या दबावाखाली काम करीत आहे हे सर्व सामान्य जनता जाणून आहे. विरोधक एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण करीत असल्याचे सांगुन सर्वसामान्य जनतेला हे माहित आहे. याचे उत्तर येत्या काळात लवकरच त्यांना मिळेल. पोलीस यंत्रणेवर टाकलेल्या दबावतंत्रामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे सर्वाना ज्ञात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात तटकरेंनी केलेल्या राजकारणाविरोधात नाराजीचा सुर उमटत आहे. याचे उत्तर जनताच त्यांना येत्या काळात देईल, असे रविशेठ पाटील यांनी सांगितले.
अनिरुध्द पाटील यांच्यावर झालेले आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसून जनतेच्या कामे करण्यासाठी एखाद्या अधिकार्याला जाब विचारणे हा जर गुन्हा होत असेल तर पुढच्या काळात महाराष्ट्रात असे अनेक गुन्हे दाखल होण्यास वेळ लागणार नाही. आमचा न्याय देवतेवर विश्वास असुन लवकरच वस्तुस्थिती जनतेसमोर येईल, असे शेवटी रविशेठ पाटील यांनी सांगितले.
पेण नगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभेत जनतेचे प्रश्न मांडण्याचा हक्क लोकप्रतिनिधींना असून जर का अधिकारी वर्ग मुजोर असेल तर त्यांना लवकरच धडा शिकवू असे त्यांनी सांगितले.