नगरसेविका दर्शना भोईर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल क्षेत्राकरीता कोविड-19च्या अनुषंगाने जास्तीच्या बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांना निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीत ग्रामीण भाग व शहरी भागाचे समावेशन झालेले असून, या परिसरामध्ये लोकसंख्येचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महानगरपालिकेकडून एमजीएम व डी. वाय. पाटील रुग्णालयांसोबत करण्यात आलेला करार महानगरपालिकेकडून रद्द करण्यात आलेला असून, यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किमान 1000 बेडस पनवेल महानगरपालिकेतील कोविड-19 च्या रुग्णांकरीता उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति माहितीसाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी व आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठविण्यात आली आहे.