बर्मिंगहम : वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोता याने डेन्मार्कच्या बलाढ्य व्हिक्टर अॅक्सेलसेन याला हरवून प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पहिल्यांदाच जिंकले. विशेष म्हणजे या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मोमोता पहिला जपानी खेळाडू ठरला. त्याच वेळी महिला गटामध्ये चीनच्या चेन युफेई हिनेही पहिल्यांदाच या स्पर्धेत बाजी मारताना तैवानच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताय त्झू यिंगला नमविले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात व्हिक्टरकडे गेल्या 20 वर्षांत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डेन्मार्कचा पहिला खेळाडू बनण्याची संधी होती, मात्र मोमोताच्या नियंत्रित खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात मोमोताने 21-11, 15-21, 21-15 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर व्हिक्टरने शानदार पुनरागमन करताना सामना 1-1 असा बरोबरीत आणला, मात्र तिसर्या व अखेरच्या गेममध्ये मोमोताने आक्रमक खेळ करताना जेतेपदावर कब्जा केला.
त्याआधी महिला गटात चीनच्या चेन युफेईने पहिल्यांदाच ऑल इंग्लंडचे जेतेपद पटकावताना जागतिक क्रमवारीतील अव्वल ताय त्झू यिंगचे आव्हान 21-17, 21-17 असे परतावले. दोन्ही गेममध्ये युफेईने मोक्याच्या वेळी गुणांची कमाई करत यिंगचे आव्हान परतविले. नियंत्रित खेळ आणि आक्रमक स्मॅश या जोरावर युफेईने कसलेल्या यिंगला पुनरागमनाची संधी दिली नाही.