पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या इतिहासात नगर परिषदेच्या सभेमध्ये झालेल्या तथाकथित प्रकरणावरून दाखल तांत्रिक गुन्ह्यात गटनेते अनिरुद्ध पाटील यांना अडकविण्याचे कट-कारस्थान तसेच पोलीस प्रशासन यंत्रणेने रात्रीच्या सुमारास आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी अनिरुद्ध पाटील यांना पकडण्यासाठी घेतलेली झाडाझडती या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पेणमध्ये गुरुवारी (दि. 29) निषेध मोर्चा व बंदची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार असून, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहराध्यक्ष हिमांशू कोठारी, युवा मोर्चा अध्यक्ष रविकांत म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रचिता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित राहणार असून, पेणकरांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माजी मंत्री व आमदार रविशेठ पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे तटकरे कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे. सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लोकप्रतिनिधी सभागृहात अनेक प्रश्न मांडतात आणि ते सोडविण्यासाठी आग्रही असतात. शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या वाद-विवादाच्या घटना महाराष्ट्रास परिचित आहेत, मात्र खासदार सुनील तटकरेंच्या दबावापुढे शरणागती पत्करत पोलिसांनी राज्याच्या इतिहासात प्रथमच पेणमध्ये 353 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणात महाविकास आघाडी सरकार व स्थानिक खासदार गलिच्छ राजकारण करीत आहेत. त्यांच्या या सूडबुद्धीच्या राजकारणाने पेण शहराच्या सांस्कृतिक, गौरवशाली प्रतिमेला डाग लागला जात आहे. या दडपशाहीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आणि पेणकरांच्या अस्मितेचे दर्शन संपूर्ण रायगड जिल्ह्याला घडविण्यासाठी जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. पेण नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा 16 ऑक्टोबर रोजी 11 वाजता नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या वेळी नरदास चाळीतील सांडपाण्याचा निचरा व अनेक वर्षे प्रलंबित असलेली जटील समस्या सोडवून येथील नागरिकांना न्याय देण्यासाठी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी विचारणा केली असता मुख्याधिकारी यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारला असता पूर्वनियोजित विचाराने त्यांनी थेट पेण पोलीस ठाण्यात जाऊन अनिरुद्ध पाटील यांच्याविरुद्ध तक्रार केली. पेण पोलिसांनीदेखील कोणतीही शहानिशा न करता राजकीय दबावास बळी पडून गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात 353, 352 आणि 506 ही कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधीने सभागृहात विचारणा करणे गुन्हा आहे का? संपूर्ण जग कोरोनाचा सामना करीत असताना शासनाकडून गोरगरिबांसाठी शासकीय अन्नधान्याची मदत पालकमंत्र्यांनी पेणमध्ये येऊन परस्पर वाटप केली. या सर्व बाबींमध्ये स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांना कधीही विश्वासात घेतले नाही. याबाबतची तक्रार आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली तसेच तटकरे कुटुंबीय हे सर्व शासकीय यंत्रणा स्वत:च्या व्यक्तिगत प्रचार व प्रसारासाठी वापरत आहेत हे जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणल्याच्या रागापोटी पालकमंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकरणात आपली सर्व राजकीय शक्ती वापरून आमदार रविशेठ पाटील आणि कुटुंबीयांना त्रास देण्याच्या हेतूने सर्व शासकीय यंत्रणा वेठीस धरली आहे. या सूडबुद्धीच्या, दडपशाहीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आणि पेणकरांच्या अस्मितेचे दर्शन संपूर्ण रायगड जिल्ह्याला घडविण्यासाठी जाहीर निषेध मोर्चा सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. त्यासाठी वैकुंठ निवासस्थान येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.