नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी संकट पूर्णपणे टळले नाही. जेव्हा कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा दावा केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने वेळेवर महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश आले. लॉकडाऊन लागू करण्याची आणि अनलॉक करण्याची वेळही योग्यच होती. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही वेळ नाही, असेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारकडून आतापासूनच कोरोना लशीच्या वितरणाची तयारी केली जात आहे. संपूर्ण देशात त्वरित लस उपलब्ध होेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारने सुरुवातीच्या टप्प्यात सर्व देशवासीयांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांपर्यंतची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीस कोरोनाची लस देण्यासाठी जवळपास 385 रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. देशातील वैज्ञानिक कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.