Breaking News

लस प्रत्येकाला मिळणार

जेव्हा कधी कोरोना प्रतिबंधक लस तयार होईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला दिली जाईल. कुणीही या लसीकरणातून वगळले जाणार नाही, असे सुस्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. लस तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून देशव्यापी लसीकरणाचा आराखडा तयार करण्याकरिता तज्ज्ञांचा राष्ट्रीय पातळीवरील गट काम करतो आहे, असेही मोदीजींनी स्पष्ट केल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीवरून राजकारण करणार्‍या विरोधकांची बोलती बंद झाली आहे.

बिहारमधील निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये कोरोनाप्रतिबंधक लस मोफत उपलब्ध केली जाईल, अशी घोषणा करताच अन्य राज्यांचे काय, असा सवाल करीत विरोधकांनी त्यावरून राजकारण सुरू केले. देशातील प्रत्येकाला लस मोफत उपलब्ध होणार का नाही याची जोरदार चर्चाही तिथूनच सुरू झाली. कोरोना महामारीनंतरच्या काळात प्रथमच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील सर्व शंकाकुशंका दूर करणारे नि:संदिग्ध प्रतिपादन केले आहे. देशातील प्रत्येकाला लस दिली जाईल. कुणीही यातून वगळले जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. कदाचित सर्वात आधी ती ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका संभवतो अशा व्यक्तींना व कोरोना आघाडीवर प्रत्यक्ष लढणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना दिली जाईल, याचाही त्यांनी या मुलाखतीत पुनरुच्चार केला. लसनिर्मितीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. चाचण्या सुरू आहेत, परंतु लस नेमकी कशी असेल, तिचे किती डोस कसे घ्यावे लागतील आदी तपशील अद्याप स्पष्ट व्हायचे आहेत. या सर्व बाबी स्पष्ट झाल्यावरच देशातील नागरिकांपर्यंत ही लस कशी न्यायची याचा आराखडा तयार करता येणार आहे. लसीचा साठा, वितरणाचे जाळे, त्यासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील पथके या सार्‍याची आखणी सुरू असून पद्धतशीर रीतीने प्रत्येकापर्यंत लस पोहचवण्याची तयारी केली जाते आहे, असे मोदीजींनी स्पष्ट केल्यामुळे आता या विषयावरून केल्या जाणार्‍या राजकारणाला पूर्णविराम मिळू शकेल. सरकारी आरोग्य योजनेंतर्गत लसीचे वाटप होईल या शक्यतेला मोदीजींच्या नि:संदिग्ध आश्वासनानंतर बळकटी मिळाली आहे. त्यामुळेच या विषयावर विरोधकांची बोलती आता बंद झाली आहे. देशात अवघ्या काहीशा कोरोना केसेस असताना आपण लॉकडाऊन पुकारल्यामुळे व केंद्र तसेच राज्य सरकारांनी एकत्रितपणे या महासंकटाचा सामना केल्यामुळेच या महामारीवर बर्‍यापैकी नियंत्रण मिळवण्यात भारताला यश मिळाले आहे याचाही मोदीजींनी या वेळी पुनरुच्चार केला. देशाची अर्थव्यवस्था हलकेहलके पूर्वपदावर येऊ लागली असून अशाच तर्‍हेने जबाबदारीने काम सुरू राहिले तर देशातील अर्थव्यवस्था भविष्यात आपले लक्ष्य निश्चितपणे गाठेल असा दुर्दम्य आशावादही पंतप्रधानांनी बोलून दाखविला आहे. जगभरात अनेक ठिकाणी कोरोना महामारीच्या दुसर्‍या वा तिसर्‍या लाटेने पुन्हा एकदा विळखा घातलेला असताना भारतातील परिस्थिती तूर्तास सावरते आहे. देशातील रुग्णसंख्येमध्ये सातत्याने मोठी भर घालणार्‍या महाराष्ट्रातही रुग्णवाढीचा आलेख गेले काही दिवस घसरतो आहे. परंतु त्या मागची कारणे समजून घेतली पाहिजेत. सप्टेंबरच्या मध्यावर राज्यात रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला होता. परंतु सरकारी गोटातील तज्ज्ञ मंडळी डिसेंबर वा जानेवारीत राज्यात पुन्हा केसेस वाढण्याची भीती व्यक्त करीत आहेत. देशाला सावरायचे असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येकाने कोरोनाविरोधी खबरदारीबाबत दक्ष राहायलाच हवे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply