पनवेल : रामप्रहर वृत्त : 1985नंतरच्या सर्व मराठी गजलांचे डॉक्युमेन्टेशन व्हावे. त्यामुळे मराठी गजल अभ्यासकांसाठी सर्व साहित्य एकत्र उपलब्ध होऊ शकेल, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. आशा श्रॉफ यांनी या वेळी मांडले. त्या पनवेल येथे झालेल्या पुस्तक प्रकाशन व खुल्या कविसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गजलग्रुप-पनवेलच्या वतीने शासकीय बी.एड्. कॉलेज, पनवेल येथे शनिवारी (दि. 30) झालेल्या कार्यक्रमात डॉ. श्रॉफ यांच्या हस्ते तीन गजलसंग्रहांचे प्रकाशन झाले. यामध्ये ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख याचे ‘गजल वेदना’, रोहिदास पोटे यांचे ‘स्वप्नातले किनारे’, डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांचे ‘अस्वस्थ समाजाच्या मनातलं काही’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
त्याचबरोबर ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांचा 73वा वाढदिवस गजलग्रुपतर्फे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले, तसेच छायाचित्रकार सुदेश दळवी व गजल या विषयावर पी.एचडी केल्याबद्दल डॉ. आशा श्रॉफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. मनीषा बनसोडे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. रमा भोसले, ज्येष्ठ गजलकार प्रमोद खराडे, ज्येष्ठ कवी व गजलकार सुभाष पवार आदी उपस्थित होते. प्रकाशनानंतर झालेल्या खुल्या कविसंमेलनात उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये दिवाकर वैशंपायन, प्रभाकर गोगटे, मीनल वसमतकर, सुहासिनी सुरेश, संजीव शेट्ये, सतीश अहिरे, पूजा नाखरे, रंजना करकरे, सदानंद रामधरणे, संदीप बोडके, प्रा. सुशील जाधव, वैभव धनावडे, डॉ. लक्ष्मण शिवणेकर, गुलाबराव आरख, श्री. कांबळे, सुनीती लिमये, बाळासाहेब तोरसकर, स्वरूपाराणी, रेखा सोनावणे, अनिल दाभाडे आदींनी आपल्या कवितांनी संमेलनात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजलकार समीर शेख यांनी केले.