महावितरणचे दुर्लक्ष
उरण : वार्ताहर : नगरपालिकेच्या हद्दीतील पंचवटी इमारतीसमोर साहिल इमारतीजवळ न वापरात येणारा विजेचा खांब वाकलेल्या अवस्थेत असून तो कधीही खाली पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे, मात्र अनेक वेळा महावितरणकडे तक्रार करूनही कित्येक दिवसांपासून महावितरणकडून दुर्लक्ष होत आहे.
उरण नगरपालिकेच्या हद्दीतील कामठा या भागातील पंचवटी, साहिल, आम्र्रपाली, सागर, सिंधू, गौरीनंदन, माऊली आदी इमारतींसाठी लागणारा विजेचा पुरवठा हा येथील असलेल्या विजेच्या खांबावरून बर्याच वर्षांपूर्वी नेण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी हा विजेचा पुरवठा विजेच्या खांबावरून काढून टाकण्यात आला व जमिनीखालून केबल टाकून नेण्यात आली. विजेच्या तारा काढलेले खांब त्या वेळेस न काढता खांब तसेच ठेवण्यात आले. ते खांब काढून टाकण्यास महावितरणास वेळ मिळाला नाही. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातील अनेक खांब वाकलेल्या स्वरूपात आहेत. ते काढून टाकावेत, अशा सूचनाही वेळोवेळी महावितरणला अनेक वेळा करण्यात आल्या आहेत. त्यातील काही विजेचे खांब वाकले असून ते पडून जीवितहानी तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ते काढून टाकावेत, अशी मागणी कामठा येथील नागरिक करीत आहेत.
या परिसरात नेहमीच रहदारी असते. त्यात नागरिकांचा, महिलांचा व लहान मुलांचा वावर जास्त असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर न वापरात असलेले विजेचे खांब काढण्यात यावेत. यादरम्यान अपघात घडल्यास, जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार महावितरण असेल, असे कामठा येथील नागरिकांनी महावितरण कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांना सांगितले.
शहरात सध्या जमिनीखालून केबल टाकण्याचे काम चालू आहे.वाकलेले, गंज लागलेले असे बरेच विजेचे खांब तालुक्यात आहेत. ते एकाच वेळेस काढून टाकण्याचे काम लवकरच सुरू करणार आहोत. खराब असलेले सर्व खांब काढण्यासाठी एकदाच वर्क ऑर्डर काढून खांब काढले जातील.
-हरिदास चोंडे, महावितरण कार्यकारी अभियंता