सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासी बंगल्यात सोमवारी (दि. 2) दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच हालचाल करून आग नियंत्रणात आणली.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त निवासी बंगल्यात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वांची एकच धावपळ उडाली. नेरुळ अग्निशमन दलातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आली. या वेळी आयुक्त बंगल्यात नव्हते. मात्र त्यांचे कुटुंब घरातच होते. सुदैवाने यात कोणतीही मोठी हानी झाली नाही.
नेरुळमधील आयुक्त निवासात सकाळी बारा वाजण्याच्या सुमाराला बंगल्याच्या दरवाज्याजवळ असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. मीटर बॉक्समधील विजेची तार आतच धुमसून जळत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होऊन एक लहानसा स्फोट झाला आणि आग लागली. या आगीत दरवाज्या जवळ असलेली खिडकी जळून खाक झाली आणि पूर्ण बंगल्यात धूर झाला होता.
सुरुवातीला बाहेर माती टाकून ही आग विझविण्यात आली. नंतर बंगल्याच्या विजेचा प्रवाह बंद करून पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. नेरुळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या यावेळी हजर होत्या. त्यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली गेली, अशी माहिती नेरुळ अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी विकास कोळी यांनी दिली.
बघ्यांची गर्दी
आयुक्त निवासातून धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत असल्याने बंगल्याबाहेर बघ्यांची गर्दी झालेली. सकाळी 9 ते 10 वाजताच्या दरम्यान, आग लागल्याचे सूत्रांकडून समजले. मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी आयुक्त निवासात चोरीचा प्रकार घडला होता यात अनेक वस्तू गायब झाल्याचे निदर्शनास आले होते. स्थानकासमोर हे आयुक्त निवास आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्त निवासाची रंगरंगोटी करून नवीन वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या.