Breaking News

वर्षी तप व्रतावर कोरोनाचे सावट; घरीच आटोपला सांगता सोहळा

कर्जत ः बातमीदार

कर्जतच्या जैन बंधू-भगिनींनी 13 महिने उपवासाचे वर्षी तप व्रत सुरू केले होते. 141 जणांनी हे व्रत पूर्ण केले. या व्रताचा सांगता सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अगदी थाटामाटात करण्याचे ठरले होते. त्याची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली होती, परंतु जगावर अचानक कोरोनाचे संकट आल्याने हा सोहळा रद्द करून प्रत्येकाच्या घरीच हा सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून साजरा करण्यात आला.

27 मार्च रोजी वर्षी तप व्रताचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला 150 जैन बंधू-भगिनींनी हे व्रत सुरू केले. 13 महिन्यांचे हे व्रत होते. काही कारणामुळे यामधील नऊ जणांना मध्येच हे व्रत सोडून द्यावे लागले. शेवटपर्यंत 141 जणांनी हे व्रत पूर्ण केले. त्यामध्ये तब्बल 119 महिला आहेत. विशेष म्हणजे हे व्रत करणारे 29 ते 87 वर्षांपर्यंतचे उपासक आहेत. काही कुटुंबातील 70 टक्के सदस्यांनी हे व्रत पूर्ण केले. एक दिवस केवळ दोन वेळा जेवायचे, नंतर एक दिवस पूर्ण उपवास करायचा. पाणीदेखील प्यायचे नाही. काही दिवसांनी दोन दिवस उपवास करायचा आणि एक दिवस जेवायचे असे हे 13 महिन्यांचे व्रत होते.

देशभरातून असंख्य जैन बांधव सोहळ्याला उपस्थित राहणार होते. त्यासाठी काहींनी विमानाची तर काहींनी ट्रेनची तिकिटेसुद्धा आरक्षित केली होती. समारंभासाठी लागणारे स्थळही निश्चित करण्यात आले होते. सुमारे सात ते आठ हजारांची उपस्थिती सोहळ्याला होणार होती. बाहेरगावाहून येणार्‍या पाहुण्यांसाठी कर्जत व परिसरातील लॉज व हॉटेल्ससुद्धा आरक्षित करून ठेवली होती, परंतु कोरोनाचे संकट आल्याने सर्व समारंभावर पाणी फेरले. अखेर प्रत्येकाने घरीच सांगता सोहळा करण्याचा निर्णय घेतला. उपवास सोडण्यासाठी लागणार्‍या उसाच्या रसाची व्यवस्था काही जैन बांधवांनी केली. कुणी गच्चीवर तर कुणी घरात हा सांगता सोहळा पार पाडला. काहींनी तीन दिवस हा सोहळा केला. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करीत धार्मिक गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply