माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सवाल
अलिबाग : प्रतिनिधी
वेतन न मिळाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) वाहक आणि चालक आत्महत्या करीत आहेत. याबाबत ठाकरे सरकार कोणाला जेलमध्ये टाकणार, असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत रायगड पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सोमवारी (दि. 9) अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी माजी खासदार किरीट सोमय्या न्यायालयात उपस्थित होते.
राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे चालक, वाहक आत्महत्या करीत आहेत. ठाकरे सरकारमुळे आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट चालक, वाहक यांनी लिहून ठेवली तर जेलमध्ये कोणाला टाकणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की परिवहनमंत्री अनिल परब यांना, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
वास्तूविषारद अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांच्या नावाची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामींना जेलमध्ये टाकले आहे. आता चालक, वाहकांच्या आत्महत्येसाठी कोणाला जेलमध्ये टाकणार, अशी विचारणा सोमय्या यांनी ठाकरे सरकारला केली आहे.