पनवेल ः रामप्रहर वृत्त
दरवर्षी 5 नोव्हेंबर हा पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि 12 नोव्हेंबर हा डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस असल्याने हा सप्ताह महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहानिमित्त सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले होते. 9 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत पनवेलचे पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक अभय जोशी यांनी विद्यार्थ्यांना पनवेलच्या परिसरातील पक्ष्यांची ओळख करून दिली. पक्ष्यांचा आहार-विहार, वेगवेगळ्या सवयी तसेच वैशिष्ट्यांचे अतिशय सुंदर वर्णन अभय जोशी यांनी केले. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पक्ष्यांचे फोटो मुलांना दाखवून त्यांंची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत अतिशय उत्साहाने भाग घेतला. अभय जोशी सरांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसनही विद्यार्थ्यांनी करून घेतले. या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी वन्यजीव संवर्धनासंबंधी पुढील पिढीमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे सांगून त्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. या कार्यशाळेमुळे परिसरातील पक्ष्यांची विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती मिळाली आणि पक्षी संवर्धनाविषयी जाणीवही निश्चितच जागृत झाली.