महाराष्ट्र, देश जिंकायचा असेल, तर आधी शिवप्रभूंचा रायगड जिंकणे आवश्यक आहे. युगपुरुषाच्या पवित्र कर्मभूमीचा प्रतिनिधी हा भगव्याचा शिलेदारच हवाय. गेल्या निवडणुकीतही भगव्याचा शिलेदारच होता. आता तोच शिलेदार पुन्हा एकदा राजकीय भवितव्य अजमावित आहेत. त्या शिलेदाराला साथ देण्याची जबाबदारी ही रायगडवासीयांची आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला गुरुवारी प्रारंभ झाला आहे. आठवडाभरात निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. या वेळीही मागील निवडणुकीप्रमाणेच भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार अनंत गीते हेच विजयी होऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडात पुन्हा एकदा शिवशाहीचा भगवाच डौलाने फडकणार आहेत यात तीळमात्र शंका नाही. मागील निवडणुकीतही अनंत गीते यांना निसटता विजय संपादित करावा लागला होता. कारण त्या वेळी रायगडात भाजपचे म्हणावे तसे प्राबल्य नव्हते, पण त्यानंतर मात्र रायगडात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार आघाडी घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आपले बस्तान बसविले आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गीते यांना भाजपची प्रामाणिकपणे भक्कम साथ लाभणार आहे. शिवसेनेने देखील भाजपचे वाढते प्राबल्य लक्षात घेऊन पूर्वीसारखे गृहित न धरता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून विजयासाठी मागक्रमण करणे गरजेचे आहे. दोन्ही पक्षांची ताकद आणि रिपाइंची साथ या जोरावर रायगडात पुन्हा एकदा गीते यांच्या रूपाने शिवसेना, भाजप महायुतीचा प्रतिनिधी दिल्ली दरबारात दाखल होणार आहे. गीते हे गेली पाच वर्षे केंद्रात मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्या मंत्रिपदाच्या काळात केलेल्या विकासकामांची पोचपावती देखील त्यांना मतदानाच्या रूपाने मिळणार आहे. आता राहिला प्रश्न तो विरोधी उमेदवार सुनील तटकरे यांचा. मागील निवडणुकीत तटकरेंचा गीतेंनी पराभव केला होता. त्यामुळे ते आता पुन्हा रिंगणात उतरलेले आहेत. या वेळी त्यांच्या जोडीला शेकाप, काँग्रेसवाले आहेत. त्यामुळे त्यांचे पारडेही जड आहे हे विसरून चालणार नाही. हे जरी खरे असले, तरी तटकरे आणि शेकाप यांच्याबाबतीत काँग्रेसजनांमध्ये असणारी नाराजी ही तटकरेंना अडसर ठरणारी आहे. आता जरी पक्षनेतृत्वाच्या दबावाखाली येऊन जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी तटकरे यांना पाठिंबा दर्शविला असला, तरी निष्ठावंत पण नाराज झालेले काँग्रेस कार्यकर्ते कुणाच्या बाजूला झुकतात यावरदेखील निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. तटकरे यांनी नाराज काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांसमोर लोटांगण घालण्यास सुरुवात केली असली, तरी त्यांची सर्व नाटके काँग्रेसजनांना चांगलीच माहीत आहेत. त्यामुळे ते तटकरे यांच्या लोटांगण नाटकापुढे झुकणार नाहीत. त्याचा फायदा गीतेंना होऊ शकतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही यानिमित्ताने घेतला जाऊ शकतो. जिल्ह्याचे राजकारण आता पुढील तीन आठवडे असेच तापत राहणार आहे. याचा फायदा कोण कशा प्रकारे घेतो यावरच रायगडचा निकाल अवलंबून आहे. सध्या रायगडात तरी युतीचीच हवा आहे. याचा फायदा गीतेंनी घ्यावा आणि रायगड लोकसभा मतदारसंघात भगवा डौलाने फडकावा, ही सदिच्छा!