Breaking News

कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारताचा अन् नाविण्यतेचा स्वातंत्र्यदिनी संकल्प करूया

पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टी पुढे आल्या आहेत, मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनी कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारत बनवण्याचा आणि नवे शिकण्याचा व शिकविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते.
आपला देश आज ज्या उंचीवर आहे, तो अनेक महान नेत्यांच्या तपश्चर्येमुळे. त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्यापैकी एक आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांची 1 ऑगस्टला शंभरावी पुण्यतिथी आहे. टिळकांचे जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आता युद्ध केवळ सीमेवरच लढले जात नाही. देशातही लढले जाते. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका ठरवावी लागेल. मागील काही महिन्यांपासून देशाने एकजुटीने कोरोनाचा सामना केला. अनेक शंका चुकीच्या ठरवल्या. देशातील रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. मृत्यूदरही कमी आहे. एकाही व्यक्तीला गमावणे ठीक नाही. आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की, कोरोना अजूनही तितकाच घातक आहे, जितका सुरुवातीला होता. त्यामुळे काळजी घेणे हेच आपले शस्त्र आहे.
बिहार, आसाममध्ये पूराने जीवन अस्तव्यस्त केले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट, तर दुसरीकडे पुराचे संकट आहे. केंद्र आणि राज्य सरकारे या संकटांशी लढत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. या वेळी पंतप्रधानांनी तामिळनाडूतील नमक्कल येथील कनिका, पानिपतमधील कृतिका, केरळमधील एर्नाकुलम येथील विनायक आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील उस्मान या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कारगिल युद्धातील शहीद जवानांना सलाम
कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. भारत त्या वेळी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रयत्न करीत होता, पण विनाकारण सर्वांशी शत्रूत्व घेणे हा दुष्टांचा स्वभाव असतो. कारगिलमध्ये भारताच्या पराक्रमी सैन्याने आपली ताकद दाखवून दिली. भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply