शाळांना ई-लर्निंग साहित्याचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जी संधी मिळाली त्याचे सोने त्यांनी केले. शिक्षकांमध्ये राहून शिक्षकांचा जीवाभावाचा नेता ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रुपाने मिळाला, असे गौरवोद्गार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी डिजिटल ई-लर्निंग साहित्याच्या वाटपावेळी केले, तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवू, असा विश्वास व्यक्त केला.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम 2023-24 अंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम गुरुवारी (दि.29) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात झाला. या वेळी पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर तालुक्यातील 60 शाळांना हे साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रोजेक्टर, स्क्रीन, माऊस, पेनड्राईव्ह आणि स्टँण्ड या साहित्याचा समावेश आहे.
या कार्यक्रमावेळी जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, विनोद डाकी, रवींद्र पाटील, अरुण पाटोळे, विधी पाटील यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, शैक्षणिक साहित्याचा सुयोग्य वापर करून आपली शाळा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असेन, अशी ग्वाही दिली.