अलिबाग : प्रतिनिधी
वसुबारस… दिवाळीचा पहिला दिवस … या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते. अलिबागजवळच्या खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत गुरुवारी (दि. 12) गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा ओटी भरण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी पार पडला. गाय हेच आपलं धन आहे, ही शिकवण आपल्याला ऋषीमुनींपासून मिळाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाची सुरूवात ही वसुबारस म्हणजे गाय, वासरांच्या पूजेने होते. सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या वतीने खानाव येथे मागील चार वर्षांपासून गोशाळा चालवली जाते. इथं गीर जातीच्या 27 मोठ्या गायी, एक वळू आणि 25 वासरे आहेत, मंडळाचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे यांनी दिली. या गोशाळेत गुरुवारी गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. तसेच दोन गर्भवती गायींचे ओटी भरण करण्यात आले. या गायींना फुलांनी सजवण्यात आले होते. त्यांची वाढी भरण्यात आल्यानंतर आरती करण्यात आली. उपस्थित महिलांनी खास गायीसाठी तयार केलेले डोहाळेगीत सादर केले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाय आपल्यासाठी गोमाताच आहे. गर्भारपणात महिलांचे डोहाळे पुरवले जातात मग प्राणीमात्रांचेही पुरवायला हवेत, म्हणून आम्ही वसुबारस बरोबरच गायींच्या डोहाळजेवणाचा विशेष कार्यक्रम ठेवला होता. गोमातेचे डोहाहजेवण करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.
-अॅड. नीला तुळपुळे, अलिबाग