Breaking News

मुख्यमंत्रीसाहेब, तुमचा 28 वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचे काय?; परीक्षार्थींचा उद्धव ठाकरेंना उद्विग्न सवाल

पुणे ः प्रतिनिधी

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणार्‍या स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत होत नसल्याने व त्यामुळे नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यावरून राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुले थेट राज्य राज्य सरकारला जाब विचारू लागली आहेत. मुख्यमंत्रीसाहेब, तुमचा 28 वर्षांचा मुलगा मंत्री होतो, पण आमच्या नियुक्त्यांचे काय, असा खडा सवाल या मुलांनी विचारला आहे. राज्यभरात स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. ही परीक्षा देताना लाखो रुपये खर्च होतात. स्पर्धा देणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत व घरून सर्व पैसे पुरवले जातात. एवढे करूनदेखील परीक्षेत पास झालो नाही तर घरचे आणि गावातील लोक काय म्हणतील असे विचार मनात येतात. यामुळे आम्ही गावाला जाणे बंद केलेय, असे या परीक्षार्थींचे म्हणणे आहे. एमपीएससी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शासन आणि आयोग कोणतेही निर्णय घेत नाहीत. परीक्षेच्या तारखेपासून ते नियुक्त्या जाहीर करेपर्यंत गोंधळ पाहण्यास मिळाला. याचा फटका सर्व कुटुंबांतील तरुणांना बसला आहे. परीक्षा देत-देत वय निघून गेलंय. कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही. एवढे शिक्षण घेऊन आमच्या वाट्याला अपयश व नैराश्य आले आहे. आम्ही कसे जगायचे आणि शेतात राबणार्‍या बापाला काय उत्तर द्यायचे, असे सवाल परीक्षार्थी विचारू लागले आहेत. मुख्यमंत्रीसाहेब, तुमचा मुलगा 28 वर्षांचा आहे. तो आमदार होतो, मंत्री होतो, पण आमचे काय? आमच्या परीक्षा ते नियुक्त्यांबाबत निर्णय घ्या. अन्यथा शेतकरी आत्महत्यांनंतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा विस्फोट होईल, एवढेच या सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही परीक्षार्थींनी दिला आहे. राज्य सरकारला 12 आमदारांचे आणि सत्ता वाचविण्याचे पडले आहे, पण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे काही नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात आमदारांनी आमच्या समस्यांवर प्रश्न विचारावा, अशी मागणी या परीक्षार्थींनी केली आहे.

किमान फेसबुक लाइव्हमध्ये सांगा!

मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही कोरोनासोबत जगण्यास तयार आहोत. तुम्ही परीक्षा घेतच नाही. मग कसे जगायचे हे तरी सांगा. तुमचे कार्यक्रम, सभा होतात, पण आमच्या परीक्षा का होत नाहीत? नियुक्त्या का होत नाहीत? तुम्ही किमान फेसबुक लाइव्हमध्ये तेवढे तरी सांगा, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply