संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले
पाली : प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारे अनुदान तब्बल चार महिन्यांपासून रखडले असल्याने दिव्यांग बांधवांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे. जागृती अपंग कल्याणकारी संस्थेने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना या बाबत निवेदन दिले आहे.
दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदानाचा मोठा आधार असतो. मागास प्रवर्गातील दिव्यांगांना हे अनुदान मिळत आहे मात्र अन्य प्रवर्गातील दिव्यांगाचे अनुदान जुलै 2020पासून आजतागायत रखडले आहे. त्यामुळे या दिव्यांग बांधवांची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेतून सर्व दिव्यांग बाधवांना जलदगतीने अनुदान मिळावे, या मागणीचे निवेदन जागृती अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना देण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश सोनकर, सखाराम कुडपणे, जगदिश कांबळे, संतोष खरीवले, खेळू निरगुडे, मारुती तेलंगे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना त्वरीत अनुदान मिळावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहे.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली, ता. सुधागड
मुरूड : प्रतिनिधी
मुरुड तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे हजारो लाभार्थी आहेत. या योजनेचा फायदा विधवा महिला व परितक्त्या महिलांना मिळत असतो. महिन्याला एक हजार रुपये ची मदत शासनाकडून या महिलांना मिळत असते. परंतु जुलै महिन्यांपासून ते आजतागत मुरुड तालुक्यातील गरीब महिलांना या योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे हजारो महिलांची दिवाळी अंधारात जाणार आहे. तालुक्यातील गरीब महिला तहसील कार्यालयात तसेच स्थानिक पत्रकार यांच्याकडे संपर्क साधून आमचे पैसे का आले नाही अशी विचारणा करीत आहेत.
परंतु पैसेच न आल्यामुळे या महिलांना तहसील कार्यालयात सुद्धा परत जावे लागत आहे. दिवाळी असून सुद्धा या गरीब महिलांना पैसे न मिल्लयामुळे त्यांची परस्थिती फार बिकट झाली आहे. आमच्या प्रतिनिधीने याबाबत संजय गांधी कार्यालयात चौकशी केली असता या योजनेचे पैसे जुलै महिन्यापासून आलेले नाहीत. तर श्रवण बाळ योजनेचे पैसे जुलै व ऑगस्टपर्यंतच आलेले आहेत. त्यामुळे मुरुड तालुक्यातील असंख्य महिलांचे मोठे हाल झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर पैसे पाठवावे अशी जनतेकडून मागणी होत आहे.