दिल्ली : वृत्तसंस्था
आजवरच्या विश्वचषक स्पर्धांसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघांपैकी सर्वोत्तम संघ म्हणून या वेळच्या संघाकडे पाहिले जात आहे. इंग्लंडमधील वातावरणाचा आणि खेळपट्ट्यांचा फायदा उठवू शकणारे विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार अशा अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यातील सलामीवीर शिखर धवन हा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पावरप्लेमध्ये तडाखेबाज फलंदाजी करणारा शिखर गेल्या चार वर्षात सातत्याने भारतीय संघाला भक्कम अशी सुरुवात करून देत आहे. त्यामुळे यंदाच्याही विश्वचषकात क्रिकेटरसिकांना त्याच्याकडून अपेक्षा आहेत.
विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजीसाठी शिखर धवन हा विराट कोहलीपेक्षाही जास्त घातक फलंदाज मानला जातो. जास्त दबावाखाली शिखर धवन तितक्याच उत्तम खेळाचे प्रदर्शन करतो. या प्रवृत्तीमुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील मॅन ऑफ द टुर्नामेंटचा प्रमुख दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
शिखर धवनने आतापर्यंत इंग्लंडमध्ये दोन मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत. 2013 साली चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शिखरने पाच सामन्यांमध्ये सर्वाधिक 363 धावा केल्या होत्या. शिखरच्या धमाकेदार फलंदाजीमुळे भारताने चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. 2017 साली पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याने उत्तम फलंदाजी करत पाच सामन्यांत 338 धावा केल्या होत्या. त्या स्पर्धेत भारत उपविजेता ठरला होता. शिखर धवनने 2018-19 या कालावधीत एकूण 32 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 49.83 च्या सरासरीने 1,307 धावा केल्या आहेत. गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक धावा करणार्या भारतीय खेळाडूंमध्ये शिखर हा तिसर्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर त्याने केलेले विक्रम आणि गेल्या दोन वर्षांत एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने दाखवलेले सातत्य पाहता शिखर धवनच विश्वचषक 2019 च्या मॅन ऑफ द टुर्नामेंटचा प्रबळ दावेदार आहे, असे म्हणता येईल.