Breaking News

पंतप्रधानांनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी

जैसलमेर(राजस्थान) ः वृत्तसंस्था
संपूर्ण जग विस्तारवादी ताकदींमुळे वैतागले आहे. विस्तारवादी वृत्ती एक मानसिक विकृती असून ती 18व्या शतकातील विचार दर्शवते. भारत या विचारांविरोधात प्रखर आवाज बनलाय. भारत आज समजण्यात व समजावण्याच्या नीतीवर विश्वास ठेवतो, पण कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तरही सडेतोड मिळेल, अशा शब्दांत भारतीय जवानांनी पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवाला पोस्टवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन व पाकला ठणकावले. पंतप्रधानांनी शनिवारी (दि. 14) राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लोंगेवाला चौकीत सीमा सुरक्षा दल व लष्कराच्या जवानांसह दिवाळी साजरी केली. या वेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी जवानांसह देशवासीयांना संबोधित केले.
या वेळी पंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, लष्करप्रमुख नरवणे, हवाई दल प्रमुख चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी जवानांसह संपूर्ण देशवायीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले की,  दिवाळीनिमित्त सर्व सैन्य दलांना माझ्या शुभेच्छा. आपण आहात तर देश आहे, देशातील लोकांचा आनंद आहे. मी आज आपल्याकडे सर्व भारतीयांच्या शुभेच्छा व प्रेम घेऊन आलोय. प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद मी आपल्यासाठी घेऊन आलोय. तुमच्यासाठी मी मिठाईही घेऊन आलोय. या मिठाईमध्ये सर्व देशवासीयांचे
प्रेम आणि आपुलकीचा स्वाद आहे. या मिठाईत देशाच्या प्रत्येक आईच्या हातची गोडी आपण अनुभवू शकता.
भारत आपल्या हितांविरोधात थोडीही तडजोड करणार नाही. भारताची शान आणि उंची आपल्या शक्ती व पराक्रमामुळे टिकून आहे. आपण देशाला सुरक्षित ठेवले आहे. त्यामुळे आज भारत जागतिक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आले असले आणि समीकरणे कितीही बदलली असली तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की सतर्कता हाच आपला सुरक्षेचा मार्ग आहे. सजगता हीच सुख-चैनीचा पाठिंबा आहे. सामर्थ्य हाच विजयाचा विश्वास आहे. सक्षमताच शांतीचा पुरस्कार आहे, अशा शब्दांत मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
जवानांसोबतच दिवाळी साजरी केल्यानंतरच उत्सव पूर्ण होतो. जवान असतील तर सण आणि उत्सव आहेत. जवानांशिवाय माझे दिवाळी साजरी करणे अपूर्ण आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी 1971मध्ये पाकिस्तानसोबत लोंगेवाला येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धाचीही आठवण काढली. भारताच्या जवानांनी इतिहास लिहिला आहे. भारतीय सैन्यासमोर कोणतीही ताकद टिकाव धरू शकणार नाही हे या युद्धाने दाखवून दिले आहे. लोंगेवाला येथील युद्धाला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. संपूर्ण देश शूरवीरांच्या गाथा ऐकून अभिमान व्यक्त करेल. आपल्या शूरवीरांचा भारतमातेलाही अभिमान आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवेत असलेल्या जवानांना नमन केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply