Breaking News

देवाची सुटका

कोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे आजपासून खुली होत आहेत. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत जवळपास सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरू झाले असताना देव मात्र मंदिरात बंदिस्त होते. त्यामुळे देवांची सुटका करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर ठाकरे सरकारला देवानेच सुबद्धी दिली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत. त्यामुळे एक निर्णय धड होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात तर प्रचंड गोंधळ उडून आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजल्याचा इतिहास ताजा आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. देशात हळुहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. ते पाहून अनेक गोष्टी पूर्वीप्रमाणे सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातही शाळा व लोकल गाड्या वगळता सर्व काही खुले करण्यास परवानगी देण्यात आली. जवळपास सारे काही पूर्ववत झाले असताना मंदिरांबाबत सरकार निर्णय घेत नव्हते. त्यामुळे मदिरालये खुली झाली असताना देवालये बंद का, असा सवाल विचारला जात होता. नागरिकांची श्रद्धा लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केले. देवस्थानच्या ठिकाणी चालणार्‍या विविध व्यवसायांवर राज्यातील लाखो कुटुंबांची उपजीविका चालते. त्यामुळे मंदिरे उघडण्यास परवानगी दिली जावी, याकडेही भाजपने लक्ष वेधले. राज्यात इतर गोष्टी सुरू झाल्या असताना कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही, मग केवळ मंदिरे खुली केल्याने कोरोना वाढेल असा सरकारचा तर्क आहे की काय, असे म्हणण्यास वाव होता. भाजपने मंदिरप्रश्नी सातत्याने आवाज उठविला. विविध धार्मिक संघटनांनीही त्यास पाठिंबा दिला. वास्तविक केंद्र सरकारने 4 जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केल्यानंतर देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झाली. महाराष्ट्रातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम व अटी-शर्तींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्यास तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्यास परवानगी देण्याची आग्रही मागणी भाविक-भक्तांतून होत होती, मात्र हरिलाच बंदिस्त करून राज्य सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले होते. यामुळे वारकरी मंडळीही आक्रमक झाली होती. कार्तिकी एकादशीला पंढरपुरातील मंदिरांची सर्व दारे उघडावीत आणि भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली. राज्य सरकारने आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेवर निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणार्‍या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असा इशाराही वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला. सर्व बाजूंनी होणारी मागणी लक्षात घेत अखेर ठाकरे सरकारने दीपावलीतील पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. असो, आता भाविकांनीही काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी ही महामारी पूर्णपणे संपलेली नाही. दिवाळी तसेच हिवाळ्यातील थंडीच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच देवाची आराधना केली पाहिजे. मग देवही साथ देईल. राज्य सरकारला मंदिरे सुरू करण्याची बुद्धी देवाने दिली आहे. आता राज्याचा कारभार कसा नीट चालवता येईल याकडेही त्यांनी लक्ष द्यावे!

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply