Breaking News

सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
देशातील सुमारे 12 राज्यांत पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे, याकडे फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंचे लक्ष वेधले आहे.
राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना या संदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. नुकतेच राज्यातील पत्रकारांनी ऑनलाइन माध्यमांतून सांकेतिक आंदोलनदेखील केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेतदेखील कोरोनाने बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जीविताची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाइन वर्कर्स जाहीर केल्यास आपसूकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असे फडणवीसांनी निवेदनात नमूद केले आहे.
याचबरोबर कोरोना साथीच्या काळात रुग्णालयात, स्मशानभूमीत जाऊन जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून पत्रकार बांधव या संकटकाळात अहोरात्र काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यातदेखील पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. असे करीत असताना कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या अतिशय मोठी आहे. असे असताना या महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का हे अनाकलनीय आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम करता येत नाही, तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊन काम करावे लागते. या संदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब घ्यावा, अशी विनंतीदेखील पत्राच्या शेवटी फडणवीस यांनी केली आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply