भाजप नेते अतुल भातखळकर यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी
लोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय बिघडले? पोलीसही हप्ते घेतातच ना असे वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारूविक्री केल्याने कारवाई केली असून, त्यांची पाठराखण करताना भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केले. गुहागरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी हे वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले? कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री, सेना आमदार भास्कर जाधवांचे धक्कादायक विधान हो बरोबर आहे. नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे?, असे म्हणत आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर
निशाणा साधला.
लॉकडाऊनमध्ये अवैध दारूविक्री केल्याप्रकरणी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबू सावंत याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी दारूदेखील जप्त केली होती. याच मुद्द्यावरून भास्कर जाधव यांनी पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवला असून, यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे जाधव यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे.