नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1मधील नागरिकांसाठी काही वर्षांपूर्वी परिवहन सेवेने सुरू केलेली बससेवा बंद केली आहे. परिणामी या ठिकाणी राहणार्या नागरिकांना आपल्या हक्काच्या बससेवेचा लाभ घेता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर येथील नागरिक व चाकरमान्यांना वाशी, ऐरोली येथे येण्या-जाण्यासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रभाग 1च्या भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला विकास झंजाड यांनी एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याकडे केली आहे.
काही वर्षांपूर्वी ईश्वरनगर ते वाशी, महापेमार्गे जाणारी मार्ग क्रमांक 12 ही बससेवा सुरू करण्यात आली होती, मात्र अवघ्या काही दिवसांनंतर कोणतेही कारण न देता ही बससेवा बंद करण्यात
आली. ईश्वरनगर येथून कामानिमित्त ऐरोली, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे आणि एमआयडीसी पट्ट्यात जाणार्या चाकरमान्यांची व व्यापार्यांची संख्या जास्त आहे. या नागरिकांना एक किलोमीटर चालत जाऊन किंवा 10 रुपये खर्चून रिक्षाने मुकुंद कंपनी येथील बस थांबा गाठावा लागतो. त्यानंतर मिळेल त्या बसने नोकरीच्या ठिकाणी जावे लागते. नागरिकांच्या दृष्टिकोनातून सकाळ-संध्याकाळच्या कामाच्या वेळेत ईश्वरनगर ते महापेमार्गे वाशी आणि ईश्वरनगर ते ऐरोली बससेवा सुरू
करावी व अखंडितपणे ही सेवा कायम सुरू ठेवावी, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला झंजाड यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार बससेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने चाचपणी करण्याचे परिवहन अधिकार्यांना सांगण्यात आले आहे. त्यानंतर ही बससेवा सुरू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी