Breaking News

मुरुडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न केल्यास जनआंदोलन; किसान क्रांती संघटनेचा इशारा

मुरुड : प्रतिनिधी

येत्या दहा दिवसात मुरूडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न झाल्यास तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना एकत्र करून मोठे जनआंदोलन छेडू, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी बुधवारी (दि. 18)दिला. मुरूड तालुक्यासाठी भात खरेदी केंद्र सुरु करावे,  या मागणीचे निवेदन काही दिवसांपुर्वी किसान क्रांती संघटनेने  तहसील कार्यालयास दिले होते. मात्र त्याचे साधे उत्तरसुद्धा न मिळाल्याने संतप्त झालेल्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मुरुड तहसील कार्यालयास धडक दिली. यावेळी संघटनेतर्फ पुन्हा एक निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. ते नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी स्वीकारले. यावेळी झालेल्या चर्चेत जंजीरकर यांनी,  केंद्र सुरु न केल्यास शेतकरी आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला. संघटनेचे मुरुड तालुका अध्यक्ष प्रशांत मिठागरी, अल्पसंख्याक संघटक अखलाक झोबडकर, राज्य सहसचिव उल्हास वारंगे, संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वीरकुड, नरेश भेर्ले, संजय डांगे, प्रभाकर मसाला, उदय चौलकर, रवींद्र बैकर, एकनाथ भंडारी, अनंत धसाडे, मजगाव संघटक गजानन भोईर, दामोदर थळे, संतोष जमनु आदी यावेळी उपस्थित होते. आपले निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आले आहे. आपण जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा मार्केटिंग पणन संघाला भेट घेऊन परिस्थिती जाणून घ्यावी, अशी सूचना यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना केली.

शेजारच्या तालुक्याला भात खरेदी केंद्र मिळते मग मुरुडला का नाही? सलग दोन वर्षे मुरुडला केंद्र मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे.

-मनोज कमाने, शेतकरी, मुरूड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply