मुरूड : प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत पंचायत समिती सभागृहात मंगळवारी (दि. 9) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात कृषी मंडळ अधिकारी विश्वनाथ आहिरे यांनी रानभाज्यांचे महत्त्व विषद केले. तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ, नायब तहसीलदार गोविंद कुटुंबे, प्रशासन अधिकारी संजय वानखेडे, प्रा. मेघराज जाधव यांची या वेळी समयोचीत भाषणे झाली. गटविकास अधिकारी सुभाष वाणी, कृषी सहाय्यक मनोज कदम, आदिराज चौलकर, विशाल चौधरी यांच्यासह आदिवासी शेतकरी या वेळी उपस्थित होते. आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या कुडा, खवणी, शेवगा, भारंग, करंटोली, पेवा, पिंपळ, खडक चिरा, आंबटवेल, दिडा, कुरडू, अळू, गरूडवेल आदी विविध रानभाज्यांची आकर्षक मांडणी या महोत्सवात उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.