Breaking News

खैरपाड्यात मृत्यूचे थैमान

10 दिवसांत पाच जणांचा मृत्यू

कर्जत : बातमीदार
तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील खैरपाडा गावात मागील 10 दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात पडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील व्यक्तींची तपासणी केली असून, होणार्‍या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने वारे ग्रामपंचायत परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कर्जत-मुरबाड रस्त्यावर वारे ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा गावात मागील 10 दिवसांपासून भीतीचे वातावरण पसरले आहे. जेमतेम 40 घरांची वस्ती असलेल्या खैरपाडा गावात 9 नोव्हेंबर रोजी एक 42 वर्षीय व्यक्ती किरकोळ आजाराने मृत्युमुखी पडली. त्यानंतर आतपर्यंत तब्बल पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातील तीन रुग्ण अनुक्रमे एमजीएम रुग्णालय कळंबोली, साई हॉस्पिटल नेरळ आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल होते, तर दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्तींना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत हे विशेष साम्य आहे.
गुरुवारीही एका 42 वर्षीय आदिवासी पुरुषाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींचे वयोमान साधारण 42-45 वर्षे एवढे आहे. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश यादव यांनी खैरपाडा गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. त्यात कोणत्याही व्यक्तीत कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागही चक्रावला आहे.
काविळीने खैरपाडा गावातील पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असावा, असा आरोग्य यंत्रणेचा प्राथमिक अंदाज आहे. त्या दृष्टीने गावातील 40 घरांत असलेल्या 28 खासगी बोअरवेलच्या पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. पांढरी कावीळ झाल्यास मृत्यूही ओढावतो. ही शक्यता लक्षात घेत कर्जत पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत, मात्र गावातील सर्व लोक पाणी उकळून पितात. तरीही मृत्यूच्या घटना थांबत नाहीत. परिणामी आरोग्य विभागाने पाण्याच्या नमुन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply