Breaking News

भामट्याकडून फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने फसवणूक

पनवेेल : वार्ताहर ओएलएक्सवर फ्लॅट विक्रीसंबंधातली जाहिरात टाकून एका भामट्याने खारघरमध्ये राहणार्‍या व्यक्तीला तब्बल एक लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या भामट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला अंकुर जैस्वाल हा खारघरमध्ये भाड्याच्या खोलीत राहण्यास असून गेल्या जानेवारी महिन्यामध्ये तो स्वत:चे घर विकत घेण्याच्या प्रयत्नात होता. यादरम्यान त्याला ओएलएक्स या वेबसाइटवर खारघर सेक्टर-10 मधील ध्रुव हाईट्स या इमारतीतील एक फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदरचा फ्लॅट विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचे अंकुर जैस्वाल याने कळविल्यानंतर त्याच्या मोबाइल फोनवर अज्ञात भामट्याने फ्लॅट मालक रोहन मोहिते असल्याचे सांगून त्याच्याशी संपर्क साधला. या वेळी भामट्याने वैयक्तिक अडचणीमुळे सदरचा फ्लॅट 62 लाख रुपयांमध्ये विकत असल्याचे अंकुरला सांगितले, तसेच त्याच्याकडे असलेली फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून दिली. सदर कागदपत्रांमध्ये फ्लॅटच्या मालकाचे नाव रोहन मोहिते असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अंकुरने आपल्या पत्नीला फ्लॅट बघण्यासाठी पाठवून दिले. या वेळी त्याच्या पत्नीने फ्लॅटची पाहणी करून सदरचा फ्लॅट हा रोहन मोहिते याचाच असल्याची खात्री केली. त्यामुळे अंकुरला भामट्याच्या बोलण्यावर विश्वास वाटल्यानंतर भामट्याने सांगितल्यानुसार अंकुरने दहा हजारांची रोख रक्कम भामट्याच्या भोपाळ येथील बँक खात्यात पाठवून दिली. त्यानंतर भामट्याने दोन-चार दिवसांत खारघर येथे त्याला भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगून अंकुरला आणखी दोन बँक खात्यांचे नंबर देऊन त्यात आणखी रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यानुसार अंकुरने एका बँक खात्यात 40, तर दुसर्‍या बँक खात्यात 50 हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर भामट्याचा कुठल्याच प्रकारे संपर्क न झाल्याने अंकुरच्या पत्नीने पुन्हा ध्रुव हाईट्स इमारतीत जाऊन चौकशी केल्यानंतर त्यांना फ्लॅटचा मूळ मालक रोहन मोहिते याचा मोबाइल नंबर मिळाला. त्यामुळे अंकुरने सदर मोबाइलवर संपर्क साधून फ्लॅटच्या विक्री व्यवहाराबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर रोहन मोहिते याने अंकुरला ओळखत नसल्याचे सांगितल्याने त्याला धक्काच बसला. त्यानंतर अंकुरने त्याच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती रोहन मोहिते याला दिली. त्यानंतर अज्ञात भामट्याने रोहन मोहिते याच्या फ्लॅटची कागदपत्रे मिळवून त्याद्वारे अंकुरला सदरचा फ्लॅट विकत देणार असल्याचे भासवून त्याच्याकडून टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर अंकुरने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणातील मूळ फ्लॅटमालक रोहन मोहितेने जानेवारीत आपल्या फ्लॅटच्या विक्रीसंबंधी माहिती 99-एकर्स या वेबसाइटवर टाकली होती. त्यावेळी आरोपीने रियल इस्टेट एजंट असल्याचे सांगून रोहनशी संपर्क साधला होता. त्याने फ्लॅटला चांगली किंमत मिळेल या भावनेने भामट्याला फ्लॅटची कागदपत्रे पाठविली, मात्र भामट्याने ती कागदपत्रे वापरून अंकुरची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply