Breaking News

पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात जागतिक रंगभूमी दिन उत्साहात

पनवेेल : वार्ताहर

येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून व धूलिवंदनाप्रीत्यर्थ करमणुकीचा वेगळा प्रकार सादर करून सफलता मिळविली. प्रथम प्रज्ञा सामंत यांनी कोकणातील प्रसिध्द बाल्यानृत्य ज्येष्ठतम भगिनींकडून बसवून सादर केले. त्यामध्ये माधवी कोल्हापुरे, मोहिनी शिरोडकर, वसुधा नवाळे, शुभांगी कराडकर, शुभांगी हजारे, मृणालिनी मोघे व प्रतिभा भोईर यांचा सहभाग होता.  वर्षा शेट्ये यांनी निवेदन केले.

त्यानंतर मंदा म्हात्रे व रजनी वाणी यांनी सुरेल आवाजात जुनी गाणी सादर केली. मुख्य कार्यक्रम होता तो संतश्रेष्ठ जनार्दन स्वामी यांचे शिष्य शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या साहित्यावर आधारित. या कार्यक्रमाची संहिता डॉ. अपर्णा वाळींबे यांनी लिहिली होती. त्यामध्ये भारूड, गवळण, वासुदेव, जोगवा, भजन आदी प्रकार होते. संहितेचे वाचन विद्या नातू यांनी केले. ते करीत असताना वासुदेवाची भूमिका पारंपरिक वेषात वसुधा नवाळे यांनी साकारली आणि धमाल केली. त्यानंतर नाथांची दोन भारूडे मोहन कुलकर्णी यांनी खड्या आवाजात सादर केली. त्यानंतर  माझे माहेर पंढरी, डोळे मोडीत राधा चाले व अरे कृष्णा अरे कान्हा, ही गीते व भजन मृणालीनी मोघे व माधवी कोल्हापुरे यांनी सादर केली.  या वेळी या गाण्यांवर आधारित फेर व टिपर्‍यांची साथ स्मिता धारप आणि सहकारी यांनी पारंपरिक वेषात मंचावर सादरीकरण केले, तर जोगवा या प्रकारातही मंचावर दत्ता ढोले, सुरेश तुपे यांनी भुत्याच्या वेषात नृत्य केले. कैवल्याचा पुतळा हे भजन प्रमोद काळे यांनी तन्मयतेने सादर करून वाहवा घेतली. वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. शेवटचा बुधवार महिलांसाठी राखीव ठरलेला असतो. तो या वेळी खर्‍या अर्थाने सर्व महिलांनी सार्थ ठरविला. सुरुवातीस वाढदिवस साजरे करण्यात आले. त्याचे निवेदन अनुप्रिता काळण यांनी केले. संगीत साथ हार्मोनियमवर वासुदेव नातू, तबल्यावर मोहन शिरोडकर, ढोलकीवर रामधरणे यांची होती. अध्यक्ष नंदकुमार जोशी यांनी कार्यक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढून सर्व उपस्थितांचे या वेळी आभार मानले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply