मुख्याध्यापक व्यंकटेश कांबळे यांनी केल्या भावना व्यक्त
नवी मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रयतेच्या कल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने शेतसारा भरणारे करावे गाव, शिक्षणातही पुढेच होते. सुमारे 101 वर्षांपूर्वी शिक्षणाच्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. अशा ज्ञानरुपी शाळेचा मी मुख्यध्यापक असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याच्या भावना व्यंकटेश कांबळे यांनी व्यक्त केल्या.
कोरोनाच्या सर्व नियमांचे अनुपालन करून, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा क्रमांक 6 चा 101 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती करावे अध्यक्षा सुशीला मनवर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे भाजपचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी केक कापून वर्धापन दिनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार केला. या वेळी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सर्वश्री उमेश पारधी, पूनम मोरे, मनोहर घरत, अर्चना पाटील, संजय कांबळे, पद्माकर पाटील आदी शिक्षकांनी योगदान दिले. सुरेल आवाजामध्ये ईशस्तवन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले, शाळागृह वर्गखोल्यांची सजावट, शालेय परिसराची सजावट केली. यावेळी विद्यार्थी, पालकही उपस्थित होते.