नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडकोतर्फे नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा तसेच या नोडमध्ये साकारल्या जात असणार्या सिडकोच्या महत्वाच्या प्रकल्पांचा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सोमवारी (दि. 23) आढावा घेतला.
या वेळी त्यांनी उलवे नोडमधील भूमीपुत्र भवन, एमटीएचल प्रकल्प, नागरी सेवा-सुविधा व त्याचप्रमाणे पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेंतर्गत सिडकोतर्फे विकसित केला जात असलेल्या पुष्पक नोडचीदेखील पाहणी केली. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांसमवेत नवी मुंबईचे मुख्य अभियंताके. एम. गोडबोले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर व सिडकोचे प्रकल्पाशी संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.
सिडको अधिकारक्षेत्रातील उलवे नोडचा झपाट्याने विकास होत आहे. अनेक मोठे व महत्वाकांक्षी प्रकल्प या नोडमध्ये साकारले जात आहेत. याचबरोबर नोडमधील नागरिकांना सर्वोत्तम दर्जाच्या नागरी सेवा-सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी सिडको कटीबद्ध आहे. याच अनुषंगाने उपाध्यक्षांनी उलवे नोडमधील रस्ते, फुटपाथ, इ. नागरी सुविधांचा आढावा घेतला व संबंधित अधिकार्यांना मार्गदर्शनपर सूचनादेखील दिल्या.
त्याचबरोबर त्यांनी महत्वाकांक्षी अशा एमटीएचएल म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या साईटला देखील भेट दिली. एमटीएचएलचे नवी मुंबईस जोडणारे टोक व त्याचप्रमाणे एकूणच या प्रकल्पाची कनेक्टिव्हीटी या सर्व बाबींचा त्यांनी आढावा घेतला.हा प्रकल्प भविष्यात सिडकोतर्फे खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ साकारण्यात येत असलेली गृहनिर्माण योजना व लॉजिस्टिक पार्क यांच्यापासून अगदीच जवळ आहे. त्यामुळे सिडकोचे परिवहन केंद्रीत विकासाचे उद्दीष्टदेखील एमटीएचएलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाची पाहणी करून उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रकल्पाशी संबंधित अधिकार्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
उलने नोडला लागूनच सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी पुष्पक नोडचा विकास करण्यात येत आहे. या नोडमध्ये प्रकल्पबाधितांना सिडकोतर्फे विकसित भूखंड दिलेले असून त्यावर बहुतांशी प्रकल्पबाधितांनी बांधकाम सुरू देखील केले आहे. याचादेखील उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी आढावा घेतला.