उरण : वार्ताहर
दुर्ग मावळा प्रतिष्ठान गेले काही दिवस द्रोणागिरी गडावरील ऐतिहासिक ठेव्याचा शोध घेत आहेत. त्याचे फलीत त्यांना मिळाले असून त्यांनी गडावर इतिहासकालीन जुने अवशेष शोधून काढले आहेत. त्यामध्ये त्यांना पाण्याचे नऊ टाके, पाच तलाव त्यातील चार तलाव 20 वर्षांपूर्वी वनविभागाच्या अधिकार्यांनी खोदले आहेत आणि एक तलाव हा इतिहासकालीन आहे. एक गुफा आढळली असून त्यामध्ये पाण्याचा टाका आहे. तसेच जुन्या बांधकामाचे अवशेष जे आज सुद्धा तीन ते चार फूट उंच सुस्थितीत आहेत.
या मोहिमेत दुर्ग मावळा परीवारातील सुजित खैरे, गणेश तांडेल, गणेश भोईर, गणेश माळी, राज म्हात्रे, लक्ष्मण कातकरी, विजय कातकरी, अजय कातकरी हे सहभागी झाले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल उरण परीसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.