नवी मुंबई : बातमीदार – सध्याच्या कोरोना महामारीवर मात करत असताना अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांवर आलेले संकट पाहता तसेच कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेलापूर मतदार संघातील नागरिकांकरिता भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अभिनव उपक्रम राबवत मोफत उपचार देणारा फिरता दवाखान्याची संकल्पना पुढे आली होती. आमदार मंदा म्हात्रे, उपमुख्यमंत्री कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या माध्यमातून मोफत फिरता दवाखाना नागरिकांच्या सेवेत बुधवारी (दि. 24) रुजू करण्यात आला. या दवाखान्याचे लोकार्पण नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की सध्याचे वर्ष हे कोरोनाच्या महाभयंकर महामारीने ग्रस्त आहे. नागरिकांमध्ये पसरलेल्या भीतीचे वातावरण पाहता तपासणी करण्यासही लोक घाबरत आहेत. अशा परिस्थितीत माझ्या बेलापूर मतदार संघातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांना मोफत तसेच त्यांच्या घराशेजारी वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टीने हा मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुदृढ महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र अंतर्गत सदर कार्य सुरु असून लवकरच आपणांस कोरोनामुक्त नवी मुंबई पाहावयास मिळेल असा विश्वास व्यक्त करून सर्व नागरिकांनी या मोफत फिरता दवाखान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले.
या वेळी स्थायी समिती माजी सभापती संपत शेवाळे, नगरसेवक अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, दत्ता घंगाळे, विजय घाटे, दर्शन भारद्वाज, जयवंत तांडेल, राकेश गुप्ता, समाजसेवक कौस्तुभ बुटाला, एचडीएफसी बँकेचे बिपीन हिरे, समीर ब्रीद, विनय चौधरी, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार,उप आयुक्त दादासाहेब राजळे, डॉ. कांचन मालवी आदी नागरिक उपस्थित होते.
उपचार व तपासण्या
फिरत्या दवाखानामध्ये मोफत प्रथमोपचार, मोफत तपासणी, मोफत बीपी व मधुमेह तपासणी करण्यात येणार असून मोफत औषधेही वितरीत करण्यात येणार आहेत. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर मतदारसंघात सर्व 52 प्रभागात हा मोफत फिरता दवाखाना फिरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या दवाखान्याचा लाभ होणार आहे.