राज्यपालांनी दिली पद, गोपनियतेची शपथ
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 30) दोघांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. दुपारपर्यंत माध्यमांवर आणि सोशल मीडियावर फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हेच समीकरण असल्याच्या चर्चा होत्या, मात्र फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले. मग पक्षनेतृत्वाच्या आग्रहाखातर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले.
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की… असे म्हणत शिंदेंनी शपथ घेतली. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथग्रहण केली.
राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह वरिष्ठ भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.